नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - फेसबुकवरून मैत्री झालेला इसम देवदर्शनासाठी मुक्कामी थांबलेला असता त्याने घरातून पाच तोळे वजनाच्या अंगठ्या व सात हजार रुपयांची रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना जय भवानीनगर परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी आकाश सिंह (वय 20, रा. दिल्ली) याची फिर्यादी चंद्रशेखर प्रेमसिंग नवले (वय 41, रा. जय भवानीनगर, आगरटाकळी रोड, नाशिक) यांच्याशी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. दि. 12 डिसेंबर 2024 रोजी आरोपी आकाश सिंह हा नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आला असता नवले यांच्या घरी मुक्कामासाठी थांबला होता.
12 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नवले व आकाश दोघे नवले यांच्या बहिणीच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर मला वडिलांचा फोन आला आहे, असे सांगून आकाश लगेच नवले यांच्या घरी निघून गेला. त्याची बॅग घेत तो दिल्लीला रवाना झाली. काही दिवसांनंतर नवले यांच्या लक्षात आले, की आकाशने त्यांच्या घरातून पाच तोळे वजनाच्या नऊ सोन्याच्या अंगठ्या व सात हजार रुपये चोरून नेले आहेत.
या प्रकरणी नवले यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार करीत आहेत.