मुंबई : फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक ठप्प झाले आहेत. जगभरात असे अनेक वापरकर्ते आहेत जे त्यांचे अकाऊंट लॉगईन करू शकत नाहीत. ज्यांनी आधीच त्यांच्या डिव्हाइसवर त्यांचे अकाऊंट लॉग इन केले आहेत, त्यांच्या समोर एक ब्लँक पेज दिसत आहे.
लोक फेसबुकवर कोणाच्याही पोस्ट पाहू शकत नाहीयेत किंवा ते कोणतेही फंक्शन वापरू शकत नाहीत. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास फेसबुक डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यूजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आउट होत आहेत.
मेटा सेवा बंद झाल्यानंतर त्याची मुख्य केंद्रं न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया असल्याचं सांगितलं जात आहे. देशभरातील अनेक वापरकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले असून ही समस्या सर्व्हरशी संबंधित असू शकते असे मानले जात आहे. ती लवकरच दुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.
यासोबतच X (पूर्वीचे ट्विटर) वरील लोकांनीही त्यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम काम करत नसल्याची तक्रार केली आहे. तसंच #facebookdown देखील X वर ट्रेंड करत आहे. मात्र, याबाबत फेसबुककडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया अॅप प्रचंड लोकप्रिय आहेत. दररोज इथे कोट्यवधी युजर्स वेगवेगळी पोस्ट करत असतात. या प्लॅटफॉर्मवर कुणी आपली कला सादर करत असतं, कुणी आपल्या भावनांना वाट करुन देत असतं, कुणी मैत्री शोधत असतं, कुणी प्रेम शोधत असतं, कुणी बिझनेस करतं, तर कुणी सामाजिक उपक्रम राबवतं. प्रत्येकासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे महत्त्वपूर्ण होतं.
या दोन्ही अॅपशिवाय युजर्सचा वेळ जाणं कठीण आहे. विशेष म्हणजे जगभरातील कानाकोपऱ्यातील कुठलेही मित्र या अॅप्समुळे जवळ आले आहेत. तर अनेकांचं उत्पन्नाचं महत्त्वाचे माध्यम हे अॅप्स बनले आहेत. त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा त्यांना मोठा फटका देखील बसण्याची शक्यता आहे.