मेटाने एक नवा नियम जाहीर केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मुलांच्या स्वातंत्र्यावर आता काही मर्यादा येणार आहेत. मेटाने जाहीर केलंय की, आता 16 वर्षांखालील वापरकर्ते आता पालकांच्या परवानगीशिवाय इंस्टाग्राम लाईव्ह जाऊ शकणार नाहीत. इतकेच नाही तर, मेसेजमध्ये देखील न्यूड फोटो पाठवण्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागेल.
हा निर्णय का घेण्यात आला?
मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचा विचार करून मेटाने हे पाऊल उचलले आहे. गेल्या काही काळापासून, मुलांवर सोशल मीडियाचा वाढता प्रभाव चिंतेचा विषय बनला आहे. यासाठी, पालकांना त्यांच्या मुलांच्या डिजिटल क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यास मदत करण्यासाठी मेटाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक टीन अकाउंट प्रोग्राम सुरू केला. हे नवीन नियम प्रथम अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये लागू केले जातील. त्यानंतर, येत्या काही महिन्यांत ते जगभरात आणले जातील. बालसुरक्षेच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे.
फेसबुक आणि मेसेंजरवरही कडक नियम
इंस्टाग्रामनंतर, आता मेटा त्यांच्या इतर प्लॅटफॉर्म फेसबुक आणि मेसेंजरवरही समान सुरक्षा उपाय लागू करणार आहे. यामध्ये इंस्टाग्रामवर आधीच असलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असेल. उदाहरणार्थ, किशोरवयीन मुलांचे अकाउंट बाय डिफॉल्ट खाजगी असतील, त्यांना अनोळखी लोकांकडून मेसेज मिळणार नाहीत, मारामारीच्या व्हिडिओंसारख्या संवेदनशील कंटेंटवर मर्यादा असेल, त्यांना एक तास वापरल्यानंतर अॅप बंद करण्याची आठवण करून दिली जाईल. रात्री नोटिफिकेशन आपोआप बंद होतील.
याचा काय फायदा होणार?
मेटाने सांगितलं की, सप्टेंबरपासून 5.4 कोटी किशोरवयीन खाती तयार करण्यात आली आहेत. आता कंपनी त्या सर्वांवर चांगले नियंत्रण आणि सुरक्षा उपाय लागू करेल.
यामुळे पालकांना सोशल मीडियावरील मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे सोपे होईल. याव्यतिरिक्त, मुलांना एक सुरक्षित डिजिटल वातावरण देखील मिळेल. ज्यामध्ये ते कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला व्यक्त करू शकतील.
सोशल मीडियाच्या वाईट परिणामांपासून मुलांना वाचवण्यासाठी META सतत प्रयत्न करत आहे. यासाठी, मेटाने त्यांच्या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर टीन अकाउंट नावाचे एक नवीन फीचर जोडलं.
ज्याद्वारे मुले आणि किशोरवयीन मुलांना वाईट गोष्टींपासून किंवा इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रभावांपासून वाचवता येते. आता भारतातही इंस्टाग्रामचे किशोरवयीन अकाउंट्स सुरू झाले आहेत.