आज प्रत्येकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो. याद्वारे आपण ओळखीच्या लोकांशी कनेक्ट होतो. अनेकदा अनोळखी लोकांशीही मैत्री करतो. पण अशी ओळख कधी कधी खूप महागात पडते. अशीच एक घटना राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन विद्यार्थीनीने एका अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावर मैत्री केली. पण त्यानंतर अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे.
राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन विद्यार्थीनीला एका मुलीकडून सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. या अल्पवयीन मुलीने काहीही विचार न करता तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. त्यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत होती. त्यांनी नंतर ट्रुथ आणि डेअर नावाचा खेळ खेळायला सुरूवात केली.
यादरम्यान सोशल मीडिया फ्रेणड्ने या विद्यार्थिनीचे काही वैयक्तिक फोटो मागितले. पीडित विद्यार्थीनीला हा फक्त खेळ वाटला. समोरची व्यक्ती मुलगी आहे, असं गृहीत धरून पीडितेने कोणताही आढेवेढे न घेता तिचे वैयक्तिक फोटो पाठवले.
काही दिवसांनंतर, पीडित विद्यार्थिनीला समजलं की, ती ज्या व्यक्तीसोबत मुलगी समजून तिचे वैयक्तिक फोटो शेअर करत होती, तो प्रत्यक्षात मुलगा होता. त्यानंतर त्या मुलाने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तो तिचे आणखी वैयक्तिक फोटो मागू लागला. पीडित विद्यार्थिनीने नकार दिल्यावर त्याने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनी घाबरली आणि तिचे फोटो पाठवू लागली.
मात्र फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी विद्यार्थिनी शाळेत गेली असता, तिच्या आईला तिचा मोबाईल पाहिला. तेव्हा फोनमध्ये पीडित विद्यार्थिनीचे अनेक अश्लील फोटो तिच्या आईला दिसले. यावरून तिच्या आईने तिला फटकारले. असे फोटो का ठेवलेत, अशी विचारणा केली. त्यानंतर विद्यार्थिनीने रडत संपूर्ण घटना आईला सांगितली.एक मुलगा अनेक दिवसांपासून तिला ब्लॅकमेल करत असल्याचं तिने सांगितलं. 20 फेब्रुवारी रोजी पीडितेच्या वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर टेक्निकल टीमच्या मदतीने पीडितेला ज्या आयडीने ब्लॅकमेल केले जात होते, त्याचा शोध घेण्यात आला. तेव्हा तो आयडी एका मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असल्याचं आढळून आलं. हा मोबाईल क्रमांक सुभान (२७, रा. उधम सिंग नगर, उत्तराखंड) याचा होता. उत्तराखंड पोलिसांच्या मदतीने त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी आरोपी सुभानला अटक केली.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा मोबाईल तपासला असता आरोपीने यापूर्वीही अनेक मुलींसोबत असंच कृत्य केल्याचं दिसून आलं. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो सापडले. त्याने मुलींच्या नावाने अनेक बनावट आयडीही बनवले आहेत, असं समोर आलंय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.