बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय वारे जोरदार वाहत आहे. अशातच तेजस्वी यादव यांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. पक्षविरोधात काम केल्यामुळे तेजस्वी यादव यांनी २७ पदाधिकारी, कार्यकर्ते अन नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. राजदने सोमवारी २७ कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकले. धक्कादायक म्हणजे त्यामध्ये दोन विद्यमान आमदार, अनेक माजी आमदार आणि राज्य महिला सेलच्या प्रमुख रितू जयस्वाल यांचा समावेश आहे.
राजदचे बिहार अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी सोमवारी संध्याकाळी याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले. काढून टाकण्यात आलेल्या नेत्यांमध्ये छोटे लाल राय आणि मोहम्मद कामरान हे २ विद्यमान आमदार आहेत. हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी आमदारांमध्ये राम प्रकाश महतो, अनिल सहानी, सरोज यादव, गणेश भारती आणि अनिल यादव यांचा समावेश आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे. एनडीए अन् इंडिया आघाडीमध्ये थेट टक्कर आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करत इंडिया आघाडीने प्रचाराला सुरूवात केली. अशातच २७ नेत्यांना पक्षविरोधी कारवायाई केल्यामुळे सहा वर्षापर्यंत निलंबित केलेय. राजदकडून याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलेय.