बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. दरम्यान बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर तसेच सीपीएमच्या उमेदवारावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर लखीसराय येथे हल्ला करण्यात आला आहे. सिन्हा यांनी थेट राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. "लोकशाहीमध्ये अशा प्रकारची अराजकता आणि गुंडगिरी अजिबात स्वीकारली जाणार नाही," असे सिन्हा यांनी सांगितले.
दुसऱ्या घटनेत छपरा येथे सीपीएम उमेदवार मांझीचे आमदार सत्येंद्र यादव यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. यादव यांना मारहाणही करण्यात आल्याचे समोर येत आहे. सारण जिल्ह्यातील मांझी विधानसभा मतदारसंघातील जैतपूर गावातील बूथ क्रमांक ४१, ४२, ४३ आणि ४४ वर काही लोकांनी यादव यांच्यावर हल्ला केला. तसेच गाडीची तोडफोडही करण्यात आली आहे.
माहिती मिळताच डीएसपी आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दौडपूर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.