बिहारच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत ओढाताण यावर लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची एक नवी पोस्ट समोर आली आहे.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "अतिशय मेहनतीने निर्माण केलेला आणि उभा केलेला 'मोठा वारसा' उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते, त्यासाठी 'आपले' आणि आपल्यांच्या भोवती असलेले काही 'नवे षडयंत्रकारी' पुरेसे असतात. आश्चर्य तर तेव्हा वाटतं, जेव्हा ज्यांच्यामुळे आपली ओळख निर्माण झाली, ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे, त्याच ओळखीच्या खुणा पुसून टाकण्यासाठी स्वतःचीच माणसे कोणाच्या तरी सांगण्यावरून तयार होतात."
रोहिणी यांच्या विधानातून असा स्पष्ट संदेश जातो की, ज्या मूळ विचारांवर आणि संघर्षावर पक्ष उभा राहिला, त्यांनाच विसरण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिलं आहे की, "जेव्हा विवेकावर पडदा पडतो आणि अहंकार डोक्यात जातो, तेव्हा विनाशकारी प्रवृत्तीच तुमचे डोळे आणि कान बनून तुमची बुद्धी हरण करतात."
रोहिणी आचार्य यांच्या या पोस्टनंतर आरजेडीच्या अंतर्गत राजकारणाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतले नसलं तरी त्यांचे संकेत बरेच काही सांगून जातात. राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाचा अत्यंत महत्त्वाचा अर्थ काढला जात आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.