अनेकांची स्वप्ने सत्यात उतरवणारा निकाल अखेर लागला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून यामुळे पात्र उमेदवार आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, हिमालय घोरपडे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीतर्फे 27 ते 29 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1,516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला.
यंदाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट-ऑफ इतिहासातील सर्वाधिक राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. या परीक्षेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी कट-ऑफ 507.50 गुणांवर, अनुसूचित जातीसाठी 447 गुणांवर, तर अनुसूचित जमातीसाठी 415 गुणांवर गेला आहे.