महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परिक्षेत एका उमेदवाराने स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिका तसेच उत्तपत्रिका लीक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईमधील बेलापूर परिक्षा केंद्रावर हा प्रकार घडला असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या बेलापूर कार्यालयाकडून 30 एप्रिल 2023 रोजी अगणित गट B आणि गट C सेवा पदभरतीकरिता ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी स्पाय कॅमेरा वापरल्याचा प्रकार समोर आला असून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराविरुद्ध परीक्षा केंद्रावर स्पाय कॅमेरा वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
आकाश भाऊसिंग घुनावत असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो जालन्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश घुनावत याने हडपसर येथील जेएसपीएम जयवंतराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पाय कॅमेऱ्याद्वारे जीवन नायमाने या व्यक्तीला पाठविली होती.
त्यानंतर जीवन नायमाने याने ही प्रश्नपत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठवली. याप्रकरणात बेलापूर पोलिसांनी विद्यार्थ्यासह तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा, 1982 मधील गैरव्यवहार प्रतिबंधक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.