नवी दिल्ली : नवंवर्ष सुरू झालं आहे, पण नव्या वर्षाच्या उत्साहासोबत कोरोनानंही धाकधूक वाढवली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 800 हून अधिक नवे रुग्ण आढळले असून गेल्या सात महिन्यांतील एका दिवसांत विक्रमी रुग्णांची संख्या वाढण्याचा हा उच्चांक आहे.
गेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे 4652 रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यात हा आकडा 3818 होता. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा नवा प्रकार JN.1 च्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढत आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट जेएन-1 ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत जागतिक स्तरावर मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या उत्साहासोबतच कोरोनाची भितीही सर्वांच्या मनात आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 841 रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 4,309 वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत जेएन 1 चे एकूण 178 रुग्ण आहेत. ज्यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक 83 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
तसेच, जानेवारी 2020 पासून आतापर्यंत भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,50,12,484 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांच 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,33,361 वर पोहोचली आहे.