उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देऊनही राज्यातून त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबरप्लेट न लावलेल्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली आहे. फक्त १० लाख ७० हजार वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जवळपास १५ लाख वाहनांना नंबरप्लेट बसवलेली नाही. यानंतर आता ज्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढ करुनदेखील अनेकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. मुदत संपली तरीही वाहनधारकांवर कारवाई झालेली नाही. वाहनचालकांना काही वेळ मिळावा, म्हणून कारवाई केली नव्हती. मात्र, आता १५ फेब्रुवारीनंतर वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दंड किती भरावा लागणार ?
एचएसआरपी नंबरप्लेट ही सुरक्षेच्या दृष्टीने बसवली जात आहे. सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी गेल्या वर्षापासून मोहिम राबवण्यात येत आहे. यानंतरही नंबरप्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांना १००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.