वाहनधारकांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या 'हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटल्यानंतर आता राज्य परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. १८ फेब्रुवारीपासून ज्या वाहनांना नवीन नंबर प्लेट नसतील, त्यांच्यावर कडक कारवाई सुरू करण्यात येईल, असे संकेत परिवहन आयुक्तांकडून देण्यात आले आहे.
केंद्र शासनाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आदेश जारी केले. जानेवारी महिन्यात बहुतेक वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना नंबर प्लेट लावून घेतली आहे. काही वाहनधारकांना फेब्रुवारी महिन्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे. यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत नवीन नंबर प्लेट बसविण्याची संधी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यानंतर १८ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते.
आरटीओ विभागाकडून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करताना, एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचे मालकीचे पत्र, वाहनांचे लायसन्स सह इन्श्युरन्स, पीयूसी सह अन्य कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. ही आवश्यक कागदपत्रे नसल्यास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.