HSRP नंबर प्लेट बसवायची आहे; नाशिक जिल्ह्यासाठी
HSRP नंबर प्लेट बसवायची आहे; नाशिक जिल्ह्यासाठी "ही" एजन्सी झाली निश्चित
img
दैनिक भ्रमर


नाशिक :  वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे आवश्यक आहे.

त्यानुसार परिवहन विभागाच्या 23 डिसेंबर 2024 रोजी परिपत्रकानुसार जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांच्या धारकांनी त्वरीत आपल्या वाहनाची एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वाहनांना  एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी  M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी व http://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून  सोयीप्रमाणे वेळ घेवून नंबर प्लेट बसवून घ्यावी. यासाठी वाहनधारकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंद कार्यालयाच्या अभिलेखावर असणे गरजेचे आहे. एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी जीएसटी वगळता दुचाकी/ ट्रॅक्टर धारकांना रूपये 450, तीन चाकी वाहनांना रूपये 500 व इतर सर्व वाहनांना रूपये 745 इतके शुल्क निश्चित केले आहे.

ज्याठिकाणी 25 किंवा 25 पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्र येवून उदा. कार्यालये, गृहनिर्माण संस्था इत्यादी ठिकाणी मागणी केल्यास संबंधित फिटमेंट  शासनाने निर्धारीत केलेल्या शुल्का व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता  एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची सुविधा अशा ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

वाहनवार एच.एस.आर.पी. नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत  करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.  काही अडचण अथवा तक्रार असल्यास  संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे तक्रार दाखल करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group