राज्यातील एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (हाय सिक्युरीटी नंबर प्लेट -एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक आहे. मात्र आतापर्यंत दीड कोटी जुन्या वाहनांपैकी सुमारे एक लाख वाहनांनाच नवीन क्रमांकाची पाटी लावल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने अंंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार वाहनधारकांनी ३१ मार्चपूर्वी ‘एचएसआरपी’ न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ' हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. जर एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही, तर मोठा आर्थिक दंड होऊ शकतो.
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.
वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.
वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे , चढविणे , दुय्यम आरसी , विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.