आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहे. गरिमा तिवारी असे तिचे नाव असून ती मॉडेल आहे. गरिमाने हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे गंभीर आरोप केले असून अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अमित मिश्रा याच्यासोबतच तक्रारीत त्याची आई बिना मिश्रा, वडील शशिकांत मिश्रा, भाऊ अमर मिश्रा, मेहुणी रितू मिश्रा आणि बहीण स्वाती मिश्रा यांचाही सहआरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
अमित दारू पिऊन वारंवार मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि कधीकधी तिला काही दिवस खायला-प्यायलाही दिलं जात नव्हतं, असे गंभीर आरोप गरिमाने केले आहेत. इतकंच नव्हे तर मॉडेलिंगच्या कामातून मिळालेले पैसे तो हिसकावून घेत असे आणि वारंवार घटस्फोटाची धमकी देत असे, असाही दावा तिने केला आहे. या सततच्या छळामुळे ती नैराश्यात गेली आणि तिला मॉडेलिंगचं करिअरदेखील सोडावं लागलं, असं तिने सांगितलं आहे.
यासोबतच अमित मिश्रा अनेक मुलींच्या संपर्कात असून त्यांच्यासमोरच तो इतर मुलींशी फोनवर बोलत आणि चॅट करत असत. अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषणही केले आहे. असे खळबळजनक आरोप देखील गरीमाने केले आहे. आजारी असतानाही अमित मिश्रा याने माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असाही आरोप तिने केला आहे.
गरिमाने या छळाला वैतागून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. एकदा फिनाइल पिऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पोलीस आयुक्त कार्यालयासह अनेक वेळा पोलिसांशी संपर्क साधूनही अमित मिश्राच्या प्रभावामुळे एफआयआर नोंदवण्यात आला नाही, म्हणून मी अखेर न्यायालयात धाव घेतली, असं गरिमाने स्पष्ट केलं.
तिचे वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी सांगितलं की, पोलिसांना वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने न्यायालयात ही तक्रार दाखल करण्यात आली. गरिमाने अमितविरोधात दाखल केलेला हा तिसहा कायदेशीर खटला आहे. याआधी तिने 21 एप्रिल 2025 रोजी त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. त्यानंतर 23 एप्रिल 2025 रोजी तिने नुकसान भरपाईची याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिने मासिक 50 हजार रुपये भत्ता आणि 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.