आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या मार्च महिन्यात ही स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
संघातील प्रमुख गोलंदाज राशिद खानने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो गेल्या महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या रिहॅब करतोय. त्यामुळे तो आगामी आयपीएल हंगामापर्यंत फिट होणार का? फिट झाला तरी तो आगामी हंगाम खेळणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
राशिद खान हा गुजरात टायटन्स संघाचा हुकमी एक्का आहे. २०२२ मध्ये गुजरातला जेतेपद मिळवून देण्यात राशिद खानने मोलाची भूमिका बजावली होती. तो जर संघातून बाहेर झाला तर हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का असेल.
काय म्हणाला हेड कोच?
अफगाणिस्तानचा हेड कोच जोनाथन ट्रॉटने म्हटलं की, ' आम्ही राशिद खानच्या कमबॅकसाठी मुळीच घाई करणार नाही. तो आमच्या संघातील प्रमुख खेळाडू आहे. तो पूर्णपणे फिट आहे की नाही याची शास्वती मिळाल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर लवकरच मैदानावर खेळताना दिसून येईल. त्यापूर्वी राशिद खान डॉक्टरांची भेट घेणार आहे. तो लवकरच मैदानावर कमबॅक करेल,मात्र आम्ही घाई करणार नाही.'