मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमामध्ये 50 लाख रुपये जिंकून प्रसिद्धीझोतात आलेल्या एका महिला तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे. अमृता सिंह तोमर असे या महिला तहसीलदाराने नाव असून त्यांना 2.5 कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
अमृता तोमर यांनी केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते, ज्यामुळे त्या 'सेलिब्रिटी तहसीलदार' म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, आता त्याच नावावर भ्रष्टाचाराचा मोठा डाग लागला आहे.
हे प्रकरण 2021 मधील असून त्यावेळी बडोदा तहसीलमध्ये आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी शासनाने मदत निधी जाहीर केला होता. पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या 2.5 कोटी रुपयांच्या निधीत मोठी अफरातफर आणि गैरव्यवहार झाल्याचा ठपका तोमर यांच्यावर आहे. चौकशीदरम्यान अमृता तोमर यांचे नाव प्रामुख्याने समोर आले, ज्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलीस ही कारवाई केली.
अटक टाळण्यासाठी अमृता तोमर यांनी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही न्यायालयांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन नाकारल्यानंतर त्या काही काळ बेपत्ता होत्या. मात्र काही दिवसांतच पोलिसांना त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची शिवपुरी जेलमध्ये रवानगी केली आहे.