खळबळजनक! निलंबित महिला तहसीलदाराकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
खळबळजनक! निलंबित महिला तहसीलदाराकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
img
Dipali Ghadwaje
नवी मुंबई : महसूल विभागात भ्रष्ट्राचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात. दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे उत्पन्नाच्या ९८ टक्के अधिक संपत्ती मिळून आली आहे. लाच मागितल्याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा शोध सुरू होता. त्यामध्ये २ कोटी ६२ लाखांची त्यांची संपत्ती मिळून आली असून, यात बहुतांश संपत्ती ही त्यांच्या पतीच्या नावे केली होती. त्यांना ७ दिवसांची कोठडी दिली आहे.

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती. 

५ घरे, १ भूखंड आणि एक गाळा -मालमत्तेच्या अधिक चौकशीत मीनल दळवी यांची तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती समोर आली आहे. त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजासोबतच ५ घरे, १ भूखंड व १ व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे. ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या (वय ५५) नावे केलेली आहे. -कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता; मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखविण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता. 

यावरून संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मीनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group