भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आ सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता त्याच्यासमोर मुंबईच्या संघाला दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या जबाबदारीमुळे सूर्यकुमारच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
टीम इंडियाला २०२६ च्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आता सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालाय. येत्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या दोन्ही स्पर्धांसाठी मुंबई टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यात आलीये. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, या संपूर्ण सिझनमध्ये सूर्यकुमार मुंबई टीमचं नेतृत्व करणार आहे.
गेल्याच महिन्यात सूर्यकुमारला मुंबईच्या रणजी टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्याने संपूर्ण देशांतर्गत सिझनसाठी आपण उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. पण निवड समितीने त्याचा रणजी टीममध्ये समावेश केला नाही. अलीकडच्या काळात सूर्यकुमारने टेस्ट सामने खेळलेले नाहीत असं कारण त्यावेळी सिलेक्टर्सने दिलं होतं. मात्र आता २० ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलीये.
14 नोव्हेंबरपासून सुरू होणार मुंबईची लढाई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. या स्पर्धेत मुंबईची एलिट 'ड' ग्रुपमध्ये आहे. या गटात मुंबईसोबत हैदराबाद, छत्तीसगड, गोवा, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड आणि विदर्भ या टीम्सचाही समावेश आहे. मुंबईचा पहिला सामना हैदराबादविरुद्ध रंगणार आहे
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निवड समितीने यंदाच्या सिझनमधील दोन्ही मर्यादित ओव्हर्सच्या स्पर्धांसाठी सूर्यकुमारची कर्णधार म्हणून निवड केलीये. टीम निवडण्यापूर्वी ७ आणि ९ नोव्हेंबरला सराव सामने खेळवले जाणार आहेत. ९ नोव्हेंबरलाच मुंबईची फायनल टीम जाहीर होणार आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरला खेळाडू कोलकात्यासाठी रवाना होणार आहेत.
टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर दिली नवी जबाबदारी सूर्यकुमार यादवसाठी यंदाचा हा सिझन खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे सूर्याचा हा अनुभव मुंबईच्या टीमच्या कामी येणार आहे. सूर्या त्याच्या आक्रामक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकवून देण्याची सूर्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.