मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार की त्यांना जामीन मिळणार याबाबतचा निर्णय आज (दि. ९) होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालय मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अटक आणि अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर आपला निकाल देणार आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गेल्या आठवड्यात निर्णय राखून ठेवला होता. हायकोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या यादीनुसार, न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा दुपारी अडीच वाजता निकाल देतील. केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत. ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर १ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयाने फटकारले
दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करणारे आम आदमी पक्षाचे (आप) माजी आमदार संदीप कुमार यांना उच्च न्यायालयाने फटकारले. याच मुद्द्यावर यापूर्वी दोन याचिका फेटाळण्यात आल्या असून ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी ही याचिका कार्यवाहक सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित करताना सांगितले की, खंडपीठाने यापूर्वीही अशाच याचिकांवर सुनावणी केली होती. खंडपीठाने याचिका स्वतःकडे हस्तांतरित केल्या होत्या आणि सर्व समान प्रकरणांची एकत्रित सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी ही तिसरी याचिका आहे.