मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील अनेक आमदार मंत्रिपदाच्या बोहल्यावर चढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी रात्री फार मोजक्या लोकांसह दिल्लीत गेले होते. दिल्लीत ते कोणाला भेटले, कोणाशी चर्चा केली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, काहीवेळ दिल्लीत थांबल्यानंतर एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी कोणालाही फारसा थांगपत्ता लागू न देता दिल्ली आणि नागपूरची वारी केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी?
एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित दिल्लीवारीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची भेट झाल्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप याबाबत, चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. एका वृत्त संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय हालचाली घडण्याचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.