मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसले आहेत”, अशी माहिती वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आली. यावेळी हायकोर्टाने सदावर्ते यांच्यावर ताशेरे ओढले.
“या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले?”, असा सवाल हायकोर्टाने केला.
दरम्यान , बिग बॉस हिंदीमध्ये गेलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे स्वतःहून लवकरच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहेत. गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून लिव्ह घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसला आपली अडचण कळवली आहे. 7 दिवसांपूर्वी गेलेले गुणरत्न सदावर्ते हे लोकप्रियता मिळत असल्याने अद्यापही बिग बॉस हिंदीच्या घरातच आहेत. त्यांनी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, “मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही”, असं हायकोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे सदावर्ते यांना आता या प्रकरणी युक्तिवाद करता येणार नाही. पण तरीही पुढच्या सुनावणीला त्यांनी विनंती केल्यावर त्यांना हायकोर्ट युक्तिवादासाठी परवानगी देतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.