संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा दुसरा धमाकेदार ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाच्याच विरोधात आहेत. यावरुन राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद देखील पाहायला मिळाला. ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत, तर याला भुजबळांनी विरोध केला. आरक्षणासाठी आग्रही भूमिका आणि आरक्षणावरील आक्षेप, विरोध हे सगळं येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या संघर्षयोद्धा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
मनोज जरांगेंच्या भूमिकेत रोहन पाटील
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाचा टीजर, ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. त्यांना सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास येत्या 14 जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.