राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांची व पक्षांची तयारी सुरु झाली आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यापूर्वी राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका सुरु आहेत.
तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झालं आहे. तर काही उमेदवारांकडून प्रचारही सुरु करण्यात आला आहे. अशातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. “मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असा निर्धार सदावर्ते यांनी केला आहे.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतंच एका मराठी वृत्त संस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबद्दलची मोठी घोषणा केली.“वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्यापर्यंत मी माझ्या भावना पोहोचवल्या आहेत. मी जर वरळीतून लढलो, तर 25 हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन. तसेच आदित्य ठाकरे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.