महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ येत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात येत आहे. राज्यातील मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारांच्या सभा पार पडत आहेत. अशातच किनवटमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे किनवट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोविंद जेठेवाडा यांनी अतिशय टोकाचा निर्णय घेतला आहे. जेठेवाडा हे विधानभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यावर विश्वास दाखवत रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी त्यांना किनवट विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून प्रचारही करण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. पण असं असताना आज अचानक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
गोविंद जेठेवाडा यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, किनवटचे रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांच्याकडून विषारी औषध प्राशन करुन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
गोविंद जेठेवाडा यांना उपाचारासाठी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलविण्यात आलं आहे. दरम्यान, गोविंद जेठेवाडा यांनी इतक्या टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण काय होतं ते शोधण्यात पोलिसांना यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.