विधानसभेच्या आधी राजकारणातच राजकारणाचे जोरदार वारे वाढू लागले आहे .युतींमध्ये जागा वाटपावरून चुरशीची लढाई बघायला मिळत आहे . जागा वाटपावरून पक्षांमध्ये आत आपसातच आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान , उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
सगळ्या मागण्या सुरू आहेत, मेरिटवर जागा लढवाव्यात अशी चर्चा सुरू आहे, पण तसं झालं नाही तर शिवसेनेने 288 जागांची तयारी केली आहे, पण आम्ही महाविकासआघाडी म्हणून लढतोय, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. ज्या जागा मागितल्या आहेत त्या वाट्याला येतील, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
‘आकड्याचा विषयच निर्माण होत नाही. मेरिट महत्त्वाचं आहे, आकडे जास्त असतील, कमी असतील. महाविकासआघाडीमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा राहणार नाही. ज्यांचं काम ज्या ठिकाणी चांगलं आहे, कार्यकर्ते चांगले आहेत, नेतृत्व चांगलं आहे, तो ती जागा लढेल, असं सूत्र राहिल. आम्ही 288 जागांसाठी तयार आहे, पण महाविकासआघाडी होत असताना प्रत्येकाच्या जागेची वाटणी होत असते, त्याप्रमाणे वाटणी होईल,’ असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.