राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान शिरूर मधून राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे.
मुलाचं अपहरण करून त्याला जबरदस्तीने विवस्त्र केलं यानंतर त्याच्यासमोर एका महिलेलाही विवस्त्र केलं आणि तिचे फोटो काढण्यात आले, असा आरोप अशोक पवार यांनी केला आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही घटना घडली आहे
तसेच, अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाणही करण्यात आली आहे. ऋषीराज पवार असं अशोक पवार यांच्या मुलाचं नाव आहे. ऋषीराज पवार हे घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अपहरण प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.