तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात एका औषध उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला. तर 26 जण जखमी झाले. सोमवारी (३० जून) सकाळी ही घटना घडली आहे.
दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमायलाराम येथील सिगाची फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये हा अपघात झाला. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात 100 हून अधिक कामगार काम करत होते. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.
जखमींना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या अपघातानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता. घटनास्थळी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले असून सध्या युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणि त्यांना आधुनिक उपचार देण्यासाठी सर्व शक्य पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.