नाशिक (प्रतिनिधी) :- एक टक्का व्याजाने दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून सोलापूरच्या भामट्याने एका इसमास दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विकास पंढरीनाथ थोरात (वय 41, रा. चेंबर नंबर 114, बिल्डिंग नंबर 2, जिल्हा कोर्ट कंपाऊंड, नाशिक) यांना काही कामासाठी पैशांची आवश्यकता होती. ते कर्ज काढण्याच्या तयारीत होते. त्यादरम्यान आरोपी अंबादास सायबू ओरसे (रा. प्रतापसिंहनगर, इंदापूर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने थोरात यांच्याशी संपर्क साधला. दोन कोटी रुपये प्रतिमाह एक टक्का व्याजाने मिळवून देतो, असे त्यांना सांगितले.
वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधून आरोपी अंबादास ओरसे याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. दरम्यान, कर्ज मिळवून देण्याच्या कामासाठी थोरात यांच्याकडून आगाऊ व्याज व टीडीएस यासाठी दहा लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या बँक खात्यात स्वीकारली; मात्र आठ महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवून न देता थोरात यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्हा कोर्ट कंपाऊंडच्या आवारात घडला.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अंबादास ओरसे या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.