नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराचा विक्री व्यवहार करून त्यापोटी रक्कम स्वीकारूनही खरेदी खत न देता विसार पावती देऊन तो फ्लॅट परस्पर विक्री करून एका वृद्धेची 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी देमा धनाजी चव्हाण (वय 68, रा. पोकार कॉलनी, गौरी विद्या अपार्टमेंट, म्हसरूळ) ही वृद्ध महिला गृहिणी आहे. ती घर खरेदी करण्यासाठी चांगल्या फ्लॅटचा शोध घेत होती. त्यावेळी आरोपी प्रशांत रंगनाथ ढाकणे (रा. दत्तनगर, पेठ रोड, नाशिक) याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधून स्वत:चा फ्लॅट विक्री करावयाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी चव्हाण याने ढाकणे याच्याशी फ्लॅटचा व्यवहार केला. त्यापोटी ढाकणे याने चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात व आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम स्वीकारली; मात्र ही रक्कम स्वीकारूनही ढाकणे याने चव्हाण यांना विक्री केलेल्या फ्लॅटचे खरेदी खत न देता खरेदी खत न देता केवळ विसार पावती दिली.
त्यानंतर ढाकणे याने या फ्लॅटवरील कर्ज फेडण्यासाठी, तसेच हा फ्लॅट चव्हाण यांना विक्री केलेला असतानाही परस्पर अन्य व्यक्तीला विक्री केला, तसेच या फ्लॅटवरील कर्ज फेडण्यासाठी रक्कम काढून घेऊन 33 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी चव्हाण यांनी आरोपी ढाकणे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात प्रशांत ढाकणेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हाके करीत आहेत.