नाशिक (प्रतिनिधी) :- सिक्युरिटी एजन्सीमध्ये अकाऊंटंट म्हणून काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने फर्मच्या बँक खात्यावरील रक्कम वेळोवेळी ऑनलाईन ट्रान्स्फर करून मालकाची सुमारे 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गोविंदसिंग बलराजसिंग जादौन (वय 76, रा. साई आशिष, आनंद विहार, गंगापूर रोड, नाशिक) यांची अरावली सिक्युरिटी ऑर्गनायझेशन नावाची फर्म आहे. या फर्ममध्ये सुमित भिकचंद बोरा (रा. गजानन पार्क, लक्ष्मीनगर, महाले पार्क, नाशिक) हा अकाऊंटंट म्हणून नोकरीला आहे.
आरोपी बोरा हा वनविहार कॉलनीतील भाग्यलक्ष्मी या इमारतीत असलेल्या अरावली सिक्युरिटी ऑर्गनायझेशनच्या कार्यालयात असताना त्याने स्वत:च्या फायद्याकरिता आपल्या पदाचा गैरवापर करून फर्मच्या नावे असलेल्या बँक खात्यावरील 35 लाख 11 रुपयांची रक्कम वेळोवेळी ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेत या रकमेचा अपहार करून फर्मचे मालक व फिर्यादी गोविंदसिंग जाधव यांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीत घडला. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फर्मचे मालक जादौन यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून आरोपी सुमित बोरा याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.