नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- फर्टीलायझर कंपनीकडून आगाऊ खते घेऊनही त्या बदल्यात पैसे न देता 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुकानदारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रोशन गणेशराव मोरे (रा. वृंदावननगर, आडगाव शिवार, नाशिक) हे अक्षत फर्टीलायझर कंपनीचे बिझनेस हेड म्हणून काम पाहतात. त्यांनी आपल्या कंपनीचा माल विक्री करण्यासाठी घोटी रोडवरील रायगड कृषी उद्योग या दुकानाचे संचालक संशयित आरोपी सागर कैलास शिंदे यांच्याशी करार केला. त्यादरम्यान आरोपी सागर शिंदे याने अक्षत फर्टीलायझर ॲण्ड प्लान्ट न्यूट्रिशियन कंपनीकडून आगाऊ खते घेतली. त्या बदल्यात पेमेंट अदा केले नाहीत.
त्यानंतर पुन्हा शिंदे यांना 40 लाख 900 रुपये किमतीची खते दिली; मात्र शिंदे याने खते घेतल्याचे पेमेंट अदा केले नाही. दि. 31 मे 2019 ते दि. 28 मे 2024 यादरम्यान 40लाखांची खते शिंदे यांना देण्यात आली. त्यासाठी कंपनीकडून तगादा लावला असता शिंदे याने 51 लाख 27 हजारांचा धनादेश, थकित पेमेंट स्वरूपात दिला; मात्र हा धनादेश बँकेत वटू शकला नाही. हा प्रकार लेखानगर येथील हॉटेल ग्रॅण्डरिओ येथे घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी सागर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अकोलेकर करीत आहेत.