नाशिक (प्रतिनिधी) :- कर्मचाऱ्यांच्या वेतनातून काढलेली भविष्य निधीची रक्कम बँकेत भरणा न करता 29 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कहर, बसमध्येच फोडले फटाके, नाशिक मधील प्रकार ....
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ललित शंकर लहामगे (वय 59, रा. एम. आय. डी. सी., सातपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. लहामगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित आरोपी रणजितसिंग इंद्रजितसिंग सौंध (वय 47) व परविंदरसिंग इंद्रजितसिंग सौंध (वय 48, दोघेही रा. महात्मानगर, प्ले ग्राऊंडजवळ, नाशिक) हे सातपूर एम. आय. डी. सी. तील युनायटेड इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीचे मालक आहेत.
सौंध बंधूंनी दि. 1 डिसेंबर 2011 ते दि. 31 मे 2019 या कालावधीत त्यांच्या कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याच्या वेतनातून भविष्य निधीची एकूण 26 लाख 66 हजार 139 रुपयांची रक्कम पगारातून काढली होती; मात्र ही रक्कम भारतीय स्टेट बँकेच्या भविष्य निधी खाते क्रमांक 1 मध्ये भरणा न करता सुमारे 29 लाख रुपयांचा अपहार केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकाविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण करीत आहेत.