२५ सप्टेंबर २०२४
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सोन्याचे दागिने तारण घेऊन व्याजाने दिलेल्या पैशांची परतफेड करून दागिने व पैसे परत न करता ग्राहकांची 38 लाख रुपयांची फसवणूक करणार्या दुसाने ज्वेलर्स दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विशाल उपगुप्त साळवे (रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की जानेवारी 2023 ते दि. 24 सप्टेंबर 2024 या कालावधीत चुंचाळे शिवारातील दुसाने ज्वेलर्सचे मालक स्वप्नील रामदास दुसाने व त्यांची पत्नी दीपाली दुसाने यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पॉलिश करण्यासाठी दहा व बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन घेतली होती.
ही चेन परत न करता फिर्यादी साळवे यांच्याकडून फोन पे व रोख स्वरूपात 25 हजार 500 रुपये घेऊन 34 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट देण्याचे आश्वासन दिले, तसेच फिर्यादी यांना सोने व पैसे परत न करता त्यांना चेक न वटण्याच्या हेतूने खोट्या सहीचे व ओव्हररायटिंग केलेला चेक देऊन फिर्यादी साळवे यांची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 25 हजार रुपये असे एकूण 4 लाख 9 हजार रुपयांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे,
तसेच दत्तनगर परिसरातील लोकांचीदेखील 492 ग्रॅम 460 मिलिग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन व्याजाने दिलेले पैसे व्याजासह परत करूनदेखील काही लोकांना खोटे सोने देऊन वर नमूद इसमांचे दागिने व पैसे परत न करता त्यांची 34 लाख 47 हजार 220 रुपयांची अशी व इतर ग्राहकांची मिळून 38 लाख 56 हजार 220 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा व पैशांचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील दुसाने व दीपाली दुसाने यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar