खंडणी प्रकारामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून किंवा राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यकर्त्यांकडून देखील खंडणी घेतली जाते.
अशाच खंडणीच्या प्रकारामुळे त्रस्त असलेल्या दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही काँग्रेसचे बडे नेते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानदाराला खंडणी मागितल्याप्रकरणात पोलिसांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
दुकानाबाहेर अनाधिकृत शेड बांधल्याबद्दल पिंपरी चिंचवड मनपाकडे तक्रार करण्याची धमकी दिली अन् ५० हजार रूपयांची मागणी केल्या प्रकरणात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पंकज बगाडे आणि गणेश दराडे अशी आहेत. गणेश दराडे हे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. ५८ वर्षाच्या किराना दुकानदाराने दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी आरोपींनी दुकानदाराला धमकी दिली. दराडे आणि बगाडे यांनी दुकानदाराकडे जाऊन ५० हजारांची खंडणी मागितली अन् पैसे दिले नाही तर ठार मारू अशी धमकी दिली. दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. त्यांनी आजूबाजूच्या दुकानादाराकडे चौकशी केली, त्याशिवाय सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी सत्य समोर आले. आरोपींनी याआधीही आजूबाजूच्या दुकानदाराला धमकावले होते अन् पैशांची वारंवार मागणी केली होती.
आरोपींकडून वारंवार धमकी मिळाल्यानंतर किराणा दुकानदाराने पिंपरी पोलिसात धाव घेतली. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कसून तपास केला. त्यांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय. त्यांना लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.