पिंपरी चिंचवड (भ्रमर वृत्तसेवा) :- पिंपरी चिंचवड मधील चिखली भागात पहाटे एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे.
चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय 10) भावेश चौधरी (वय 15) अशी आगीत मृत पावलेल्यांची नावे आहेत. याच हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होते. एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णानगर, चिंचवड येथे आज पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. आगीने काही वेळात रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी चार मृतदेह बाहेर काढले आहेत. आगीच्या घटनांमध्ये सध्या व मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून अनेक जण यात मृत्युमुखी पडत आहेत. मृत नेमके कोण आहेत याबाबत अजून माहिती समोर आली नसून याचा तपास करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली असून या आगीत आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी परिसरात राहणाऱ्या काही लोकांच्या ही बाब लक्षात आल्याने ही घटना समोर आली आहे.