पिंपरी चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. गेल्या आठवड्यात दिवाळीच्या दिवशी चारित्र्यावर संशय घेऊन सारखं भांडण करणाऱ्या नकुल भोईर, त्याच्याच पत्नीने ओढणीने गळा आवळून खून केला होता. यामुळे संपूर्ण शहर हादरलं होतं. 
पोलीस तपासात नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या बायकोने केल्याने समोर आले होते. या प्रकरणी चैतालीला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. नकुल भोईर हत्या प्रकरणात आज पोलिसांनी चैताली भोईरचा प्रियकर सिद्धार्थ पवारला (२१ वर्षे) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नेमकं प्रकरण काय ? 
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नकुल आनंद भोईर (४० वर्षे) यांची २४ नोव्हेंबरला हत्या करण्यात आली होती. मध्यरात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली होती. नकुल भोईर यांची हत्या त्यांची बायको चैताली भोईरने (२८ वर्षे) हिने केली होती. दोघेही चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीत माणिक कॉलनी या ठिकाणी राहत होते. नकुल भोईल यांना चैतालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.
२४ नोव्हेंबरला देखील चैताली आणि नकुल यांच्यात याच कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुलची हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी चैतालीला अटक करत तपास सुरू केला होता. नकुल भोईर हे मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी होते. या प्रकरणात आता पोलिसांनी चैतालीच्या प्रियकराला देखील अटक केली.
चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ याला पोलिसांनी अटक केली असून त्यामुळे बरीच माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. आरोपी सिद्धार्थ पवार आणि चैताली भोईर या दोघांमध्ये प्रेम संबंध होते . तर चैतालीचा पती नकुल या प्रेम संबंधात अडसर ठरत होता. एवढंच नव्हे तर चैतालीने घेतलेल्या कर्जाची माहिती नकुलला समजल्यावर त्यांचा वाद झाला. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ पवार समोरच नकुलने चैतालीला मारहाण केली. 
ते पाहून सिद्धार्थला राग अनावर झाला, त्यानंतर सिद्धार्थ आणि चैताली या दोघांनी संगनमतानेच नकुल भोईर याचा ओढणीच्या साह्याने गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणात फक्त चैताली नव्हे तर तिचा प्रियकर सिद्धार्थ हाही आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.