शिक्षण विभागाने एक दिवसाचे वेतन कपात केले तरी आता माघार घ्यायची नाही, अशी भूमिका राज्यातील शिक्षक संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ५ डिसेंबर रोजी राज्यातील २५ हजार शाळा बंद राहणार, असा ठाम निर्धार शिक्षक संघटनांनी व्यक्त केला.
राज्यातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विनाअनुदानित अशा जवळपास २५ हजार शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शिक्षक संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत.
शिक्षकांच्या समायोजनामुळे नववी आणि दहावीच्या जवळपास १८ हजार शाळा बंद पडणार आहेत. शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांचे आयुष्यही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे एक दिवसाचे काय, महिनाभराचे वेतन कपात केले तरी चालेल, पण आता माघार नाही, आंदोलन होणारच असा निर्धार मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केला.