आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या एका आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी समालोचनला रामराम ठोकला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर केली. त्यांनी पोस्ट करत लिहिलं की, बीसीसीआयसाठी समालोचन करण्यापासून निवृत्त घेत आहे. येथपर्यंत ठीक आहे. पण पुढे त्यांनी जे काही लिहिलं त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी बीसीसीआयवर वर्णभेदाचा गंभीर आरोप केला आहे.
शिवरामकृष्णन यांनी शुक्रवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "मी बीसीसीआयसाठी समालोचन करण्यापासून निवृत्त होत आहे." लक्ष्मण शिवरामकृष्णन आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत नाणेफेक आणि बक्षीस वितरणासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला संधी न मिळाल्याने निराश झाले होते. नवीन समालोचकांना सतत संधी मिळत राहिली, तर आपल्याकडे बराच काळ दुर्लक्ष केले गेले, असे त्यांनी म्हटलं आहे.
शिवरामकृष्णन यांनी सांगितले की, निवृत्तीमागे टीव्ही निर्मितीशी संबंधित एक मोठी कहाणी आहे, जी लवकरच उघड होईल. जेव्हा एका युझरने वंशभेदाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा त्यांनी त्याचे समर्थन करत हा वाद आणखी वाढवला. त्यांनी लिहिले की, "मला नाणेफेक आणि बक्षीस वितरण करण्याची संधी मिळाली नाही." शिवरामकृष्णन म्हणाले, "गेल्या 23 वर्षांपासून मला नाणेफेक आणि बक्षीस वितरण समारंभासाठी पाठवले गेले नाही, उलट खेळपट्टीचा अहवाल, नाणेफेक आणि बक्षीस वितरण समारंभासाठी नवीन लोकांना पाठवले जात आहे." रवी शास्त्री प्रशिक्षक असतानासुद्धा मला पाठवले गेले नव्हते, तर याचा अर्थ काय असू शकतो?'
ते म्हणाले, "बीसीसीआयच्या हक्क कंपनीची काय अवस्था असेल याचा कोणीही अंदाज लावू शकतो. माझी निवृत्ती ही काही मोठी गोष्ट नाही, पण टीव्ही निर्मितीबद्दल एक नवीनच कहाणी समोर येत आहे. संपूर्ण चित्र लवकरच तुमच्यासमोर स्पष्ट होईल." जेव्हा एका वापरकर्त्याने विचारले की त्यांच्या त्वचेचा रंग हा काही मुद्दा आहे का, तेव्हा शिवरामकृष्णन यांनी उत्तर दिले, "तुम्ही बरोबर आहात. वर्णद्वेष." शिवरामकृष्णन हे दोन दशकांहून अधिक काळ समालोचन कक्षातील आपल्या स्पष्टपणासाठी ओळखले जातात.
शिवरामकृष्णन 2000 सालापासून समालोचन करत होते. त्यांनी आयसीसी क्रिकेट समितीवर खेळाडू प्रतिनिधी म्हणूनही काम केले. ते 1983 ते 1986 या काळात भारतासाठी नऊ कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले. 1984 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 12 बळी घेऊन ते चर्चेत आले. ऑस्ट्रेलियात झालेल्या 1985 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आपल्या गोलंदाजीने संघाच्या विजयात योगदान दिले.