राज्यात हल्ली वाढती ट्राफिक, भरधाव वाहने यांमुळे अपघातांचा प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान आता सोलापूरमहून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.
पुण्याहून उमरग्याकडे जाणाऱ्या एसटी बसला सोलापूरजवळील शेळगी परिसरात ट्रकने भीषण धडक दिल्याने भयानक अपघात घडला आहे.
शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला एसटीची मागून धडक बसली. या भीषण अपघातात एसटी चालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस पुण्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे जात होती. पहाटे सुमारे ४:३० वाजता बस सोलापूर मध्यवर्ती एसटी स्टँडवर पोहोचली. तेथून प्रवाशांना घेऊन बस उमरग्याच्या दिशेने रवाना झाली. सोलापूर शहराबाहेर पडताच, शेळगी परिसराजवळ सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली.
धडक इतकी जोरदार होती की, एसटीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला. चालक दादाराव बनसोडे (वय ४३) आणि समोरच्या सीटवर बसलेल्या नागुबाई रेवगे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या १० प्रवाशांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.