डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Google Pay, PhonePe आणि Paytm वरून व्यवहार करणाऱ्यांमध्ये सध्या एका नव्या नियमाची चर्चा सुरू आहे. ₹२,००० पेक्षा जास्त UPI पेमेंटवर अतिरिक्त चार्ज आकारला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हा चार्ज नेमका कोणाला लागू होणार, ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार का आणि NPCI चा नियम काय आहे? जाणून घेऊया सविस्तर…
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या काही UPI पेमेंटवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाणार असल्याची माहिती समोर आलीये. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याआधी १५ ऑक्टोबरपासून हे दर लागू करण्याची योजना आखली होती. पण दिवाळीचा सण लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता हे नवे दर नेमके कधी लागू होणार आणि याचा ग्राहकांचा खिशावर परिणाम होणार का? जाणून घेऊया.
२,००० पेक्षा जास्त पेमेंटवर किती चार्ज? NPCI ने १५ सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या FAQ नुसार, निवडक व्यापाऱ्यांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या २००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर ०.४ टक्के MDR आकारला जाईल. पण या चार्जची मर्यादा ३०० रुपये ठेवण्यात आली. म्हणजेच, व्यवहाराची रक्कम कितीही मोठी असली तरी संबंधित व्यवहारासाठी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त MDR आकारला जाणार नाही.
उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने दुकानदाराला १ लाख रुपये UPI च्या मदतीने दिले, तर ०.४ टक्क्यांनुसार ४०० रुपये चार्ज होतो. पण कमाल मर्यादेमुळे दुकानदाराला ३०० रुपये MDR द्यावे लागतील.
काही व्यवहारांसाठी वेगळे चार्ज रेल्वे, टेलिकॉम, विमा आणि इंधन यांसारख्या काही विशिष्ट क्षेत्रांसाठी वेगळे दर ठरवण्यात आले आहेत. या श्रेणीतले २,००० पेक्षा जास्त व्यवहारांवर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी ५ रुपये फ्लॅट चार्ज आकारला जाईल. तर म्युच्युअल फंड, शेअर्स आणि स्टॉक ब्रोकरशी संबंधित पेमेंटवर ०.२ टक्के MDR लागू होईल. या व्यवहारांसाठीही कमाल चार्जची मर्यादा ३०० रुपये आहे.