लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून लवकरच दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. १ मे रोजी याबाबतची सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणवासियांची वाहतूक कोंडी सुटणार असून प्रवास सुसाट होणार आहे.
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून कामानिमित्त शहरात राहणारे नागरिक मतदानासाठी आपआपल्या गावाकडे परतत आहेत. मुंबईतील चाकरमान्यांनी देखील कोकणाची वाट धरली आहे. निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
कशेडी घाटात पुन्हा बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याबाबतचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले आहेत. त्यामुळे कोकणवासियांना अवघ्या ५ ते ७ मिनिटात कशेडीचे घाट अंतर भोगद्यावाटे कापता येणार आहे. यामुळे चाकरमान्यांच्या वळणावळणाचा कशेडी घाटातील प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.