मुंबई : ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांना जंग जंग पछाडले. मात्र, त्यांची पळता भोई थोडी झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळेच कोकणाने त्यांची साथ सोडली. आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही. कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही ; सगळे किल्ले उद्ध्वस्थ झाले , असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प, स्टे दिलेले स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. विकासाचे प्रकल्प , कल्याणकारी योजना, लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आम्ही आणल्या. विकास आणि योजना याची सांगड घालण्याचे काम आम्ही केलं.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आहेत. जनता जनार्दन येणाऱ्या काळात आमच्या कामाची पोचपावती देईल. महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार मेजोरिटीने महाराष्ट्रात येईल. आम्ही पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यास तयार आहोत. आमची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल.
लोकसभा निवडणुकीत मशालीविरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. लोकसभेत आम्ही 13 जागा समोरासमोर लढल्या. त्यातल्या आम्ही सात जागा जिंकल्या. आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट होता, त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता. त्यांच्यापेक्षा 2 लाख 60 मत आम्ही जास्त घेतली आहेत.
लोकसभा निवडणुकीत फेकाफेकी करुन, फेक नेरेटिव्ह करुनही धनुष्यबाण भारी पडला होता. लोकांना फसवून देखील लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा चांगला होता. कामाच्या जोरावर महायुतीचा विधानसभेला स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल. महायुती सर्वांना चारीमुंड्या चित करेल. या निवडणुकीत आमचे लोक चौकार -षटकार मारतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.