पॅरिस : भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील अभियान सुरु झालं आहे. भारताकडून 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रँकिंग राऊंडमध्ये भारताच्या टीमनं दमदार कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर यांनी भारताला 1983 अंक मिळवून दिले. भारतीय संघानं चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

भारतानं उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं आहे. वैयक्तिक कामगिरीचा विचार केला असता भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी अंकिता भगत हिनं केली. तिनं 72 शॉटमध्ये 666 अंक मिळवले. ती अकराव्या स्थानावर राहिली. दुसरीकडे भारताच्या इतर तिरंदाज दीपिका कुमारी आणि भजन कौर टॉप 20 च्या बाहेर राहिल्या.
अंकिता भगत अकराव्या स्थानावर राहिली. तर, भजन कौर 22 व्या आणि दीपिका कुमारी 23 व्या स्थानावर राहिल्या. अंकिता भगतनं दुसऱ्या हाफच्या शेवटच्या 2 सेटमध्ये शानदार कामगिरी केली. यामथ्ये तिनं 120 पैकी 11 गुण मिळवले. भजन कौरला अखेरच्या फेरीत दमदार कामगिरी करता आली नाही. तिनं 659 गुण मिळवले. तर, दीपिका कुमारीनं 658 गुण मिळवले.
भारत उपांत्यपूर्व फेरीत
ऑलिम्पिकमधील तिरंदाजीच्या नियमानुसार पहिल्या चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान दिलं जातं. भारतीय संघ चौथ्या स्थानी असल्यानं त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं आहे. भारत 1983 अंकांसह चौथ्या स्थानावर राहिले. भारताची आगामी लढत फ्रान्स आणि नेदरलँडस यांच्यातील विजयी संघासोबत होईल. 5 ते 12 व्या क्रमांकावर असणाऱ्या संघांना राऊंड ऑफ 16 मधून जावं लागणार आहे.
रँकिंग राऊंडचा हेतू तिरंदाजीत 128 खेळाडूंचं ब्रॅकेट तयार करणं हा होता. 128 खेळाडू आता एकेरीमध्ये रँकिंगनुसार वैयक्तिक लढतींमध्ये खेळतील. राऊंड ऑफ 64 तयार करण्यात येईल. यानंतर राऊंड ऑफ 32 त्यानंतर उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत अशा लढती होतील.
दरम्यान, भारताकडून 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला 7 पदकं मिळाली होती. यावेळी पदकांची संख्या वाढण्याची देशभरातील क्रीडा चाहत्यांना अपेक्षा आहे.