रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाखांची फसवणूक
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाखांची फसवणूक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) : रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आकाश सुरेंद्र मेहरोलिया (वय 30, रा. सायदीप सोसायटी, जय भवानी रोड, नाशिकरोड) हा तरुण नोकरीच्या शोधात होता. तो नोकरीचा शोध घेत असताना आरोपी अनिल चंडालिया (वय 45, रा. कोपरखैरणे, वाशी, नवी मुंबई), किशोर लोहट व अलम शेख (दोघांचेही पत्ते माहीत नाहीत) यांनी आकाश मेहरोलिया याच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी या तिघा आरोपींनी त्याच्या घरी येऊन त्याला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात तिघाही आरोपींनी फिर्यादी आकाश मेहरोलिया याच्याकडून 7 लाख 15 हजार रुपये घेतले. त्यानंतर तिघा आरोपींनी संगनमत करून रेल्वे विभागाच्या नावाने बनावट व खोटे मेडिकल कॉल लेटर, मेडिकल फिटनेस सर्टीफिकेट, नियुक्तिपत्र, परिचयपत्र देऊन त्याची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 1 जून 2016 ते दि. 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत फिर्यादी आकाश मेहरोलिया यांच्या घरी घडला.

संशयितांनी दिलेले कॉल लेटर व नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी आकाश मेहरोलिया यांनी उपनगर पोलीस ठाण्यात अनिल चंडालिया, किशोर लोहट व आलम शेख यांच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे करीत आहेत.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group