नाशिक (प्रतिनिधी) : ऑनलाईन पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने अज्ञात इसमाने एका तरुणाची पावणेतीन लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अभिषेक रामप्रसाद अग्रहरी (वय 28, रा. मोती सुपर मार्केट, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) हे खासगी नोकरी करतात. ते वेगवेगळ्या ऑनलाईन साईटवर पार्टटाईम जॉबच्या शोधात होते. त्यावेळी अज्ञात इसमाने टेलिग्राम आयडी यावरून फिर्यादी अग्रहरी यांच्याशी चॅटिंग सुरू केली.
त्यादरम्यान, अज्ञात इसमाने ऑनलाईन पार्टटाईम जॉब करण्याचा बहाणा केला. त्यावर अग्रहरी यांचा विश्वास बसला. त्यानंतर संशयितांनी एक लिंक पाठविली. त्या लिंकवर एअर तिकीट बुकिंग करण्याचा बनावट टास्क देऊन फिर्यादी अग्रहरी यांना पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँकेच्या खाते क्रमांकावर एकूण 2 लाख 76 हजार 897 रुपये भरण्यास लावून अग्रहरी यांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार दि. 4 ते 8 सप्टेंबरदरम्यान घडला.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.