Nashik Crime : तलाठ्याला साडेपंधरा लाखांना फसविले
Nashik Crime : तलाठ्याला साडेपंधरा लाखांना फसविले
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (चंद्रकांत बर्वे) :- “माझी मंत्रालयात ओळख असून, तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो,” असे सांगून दोन जणांनी एका तलाठ्याकडून साडेपंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ग्यानदेव झांबरू चौरे (रा. गायत्रीनगर, पोकार कॉलनी, दिंडोरी रोड, पंचवटी) हे दिंडोरी तालुक्यातील चौसाळे गावाचे तलाठी आहेत. ते पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्यासह राहतात. सन 2021 मध्ये म्हाडाची नोकरभरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती.

त्यादरम्यान फिर्यादी चौरे यांची समाधान प्रल्हाद गांगुर्डे या व्यक्तीशी खातेदार या नात्याने ओळख झाली. त्यावेळी दोन मुलांपैकी एका मुलाने नोकरीसाठी अर्ज भरल्याचे व त्याची परीक्षा होऊन निकाल बाकी असल्याचे सांगितले होते. त्या व्यक्तीने त्याच्या मित्राची मंत्रालयात ओळख आहे, असे सांगून तो बेरोजगार मुलांना नोकरी लावून देतो, असे आश्‍वासन देऊन समाधान गांगुर्डे याने संदीप काळभोर (रा. जेलरोड, नाशिक) हा रूपाली चाकणकर यांचा पीए असल्याची माहिती दिली.

त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क केला आणि फिर्यादी यांची संदीप काळभोर याच्यासोबत जेलरोड येथे भेट घालून दिली. ही भेट झाल्यानंतर काळभोर याने सांगितले, की मयूर खालकर याची मंत्रालयात ओळख असून, तो तुमच्या मुलाच्या नोकरीचे काम करून देईल. मी तुमचे त्याच्याशी बोलणे करून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने दोन वेळा मुंबई येथील मंत्रालयात घेऊन जात बोलणे करून दिले. त्यानंतर पुढे मयूर खालकर याला भेटण्यासाठी त्याच्या पत्नीच्या माध्यमातून त्याने सिन्नर येथील बस कंडक्टर राहुल पवार याच्याकडे घेऊन गेले. राहुल पवार हे मयूरचे मित्र आहेत. तेच भेट घालून देतील, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी चौरे, त्यांची दोन मुले, भाऊ मोतीलाल चौरे असे सर्व जण सिन्नर येथे जाऊन राहुल पवार याला भेटले.

त्याने मयूर खालकर त्याचा जवळचा मित्र असून, त्याने अनेक जणांचे काम करून दिल्याचे सांगून त्यानेच मयूर खालकर (रा. सिन्नर) याच्याशी प्रत्यक्ष भेट करून दिली. दि. 2 फेब्रुवारी 2022 रोजी संदीप काळभोरच्या सांगण्यानुसार फिर्यादी चौरे, त्यांचा मुलगा योगेश व प्रदीप चौरे व भाऊ मोतीलाल चौरे असे चौघे जण सोबत संदीप काळभोर, त्याची पत्नी, राहुल पवार असे सिन्नर येथील पंचवटी हॉटेलमध्ये जाऊन मयूर खालकर याला भेटले. त्यावेळी खालकर याने चौरे यांना सांगितले, की तुमचा मुलगा प्रदीप चौधरी याला म्हाडामध्ये नोकरीला लावण्यासाठी 17 लाख रुपये लागतील, असे सांगितले. यावर त्यांनी नकार दिला; मात्र मयूर खालकर याने मंत्रालयात सचिवपदावर असलेल्या अधिकार्‍याशी ओळख असल्याचे भासविले, तसेच खालकर आमच्यासमक्ष कोणाला तरी फोन लावून ज्या पद्धतीने बोलला, त्यामुळे त्याची मंत्रालयात ओळख असल्याची खात्री फिर्यादी चौरे यांना झाली.

आरोपी खालकर याने चौरे यांना विश्‍वासात घेऊन तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून 15 लाख 50 हजार रुपयांत नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन दिले. त्याच दिवशी फिर्यादी चौरे यांनी आरोपी खालकर याला साडेपाच लाख रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतर दि. 7 मे 2022 रोजी चौरे यांच्या मोबाईल क्रमांकावर आरोपी खालकर याने एक मेसेज केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी चौरे यांनी आरोपी खालकर याला फोन केला असता, “मंत्रालयात साहेबांशी माझे बोलणे झाले आहे. मी हवालामार्फत पैसे देण्याचे त्यांना सांगितले आहे.” त्यावर चौरे यांनी पैशाची व्यवस्था करतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपी खालकर याने पुन्हा चौरे यांना मेसेज करून पैशांची व्यवस्था लवकर करावी. कारण मला ते मुंबईला पाठवायचे आहेत, असा मेसेज केला. त्यामुळे फिर्यादी चौरे यांनी एच. डी. एफ. सी. बँकेने घरावर काढलेल्या 22 लाख रुपयांच्या कर्जातून 10 लाख रुपये दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी चौरे यांनी दोन्ही मुलांना सोबत घेऊन जात रोख स्वरूपात मयूर खालकर याला सिन्नर टोल नाक्याजवळ दिले.

त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी चौरे यांनी आरोपी खालकर याला फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने चौरे यांचा फोन उचलणे बंद केले. त्यानंतर चौरे यांनी मेसेज करून यादी लागली का, याबाबत विचारणा केली असता त्याने “मी दिल्लीला होतो, मी बाहेर आहे. नंतर सांगतो,” तसेच “राहुलशी बोला,” अशी एक ना अनेक कारणे सांगून वेळ मारून नेली. असे बरेच दिवस झाल्यानंतर आरोपी मयूर खालकर याने सांगितले, की मंत्रालयातील साहेबांशी बोलणे झाले नाही, त्यांचा संपर्क होेत नाही, त्यानंतर म्हाडाची नोकरभरतीची लिस्ट आल्यानंतर मी त्यांना दाखविली. बरेच दिवस झाल्याने व कामही न झाल्याने चौरे यांनी आरोपी खालकर याला पैसे परत देण्यास सांगितले; परंतु त्याने कामही केले नाही व पैसेही परत दिले नाहीत. आठ दिवस थांबा, पंधरा दिवस थांबा, असे सांगून तो वेळ मारून नेत होता. चौरे यांनी आरोपी खालकर याला पैसे दिल्याचे पुरावे व आपल्यातील बोलणे झाल्याचा पुरावा असल्याचे सांगून पैसे परत मागितले.

त्यानंतर त्याने फिर्यादी चौरे यांना तीन व एक लाख रुपयांचे असे दोन चेक दिले. फिर्यादी चौरे यांनी प्रथम तीन लाखांचा चेक बँकेत टाकला असता तो बाऊन्स झाला. याबाबत चौरे यांनी आरोपी खालकर याच्याकडे विचारणा केली असता त्याने बिटको पॉईंट येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार दि. 17 डिसेंबर 2023 रोजी चौरे व त्यांचा भाऊ असे दोघे जण आरोपी मयूर खालकर याला भेटण्यासाठी बिटको पॉईंट येथील वैष्णवी हॉटेल येथे गेले. त्यावेळी आरोपी खालकर याने “मला सतत फोन करू नका. माझ्याकडे पिस्तूल आहे,” असे बोलावून शिवीगाळ केली, तसेच “माझ्या नादी लागायचे नाही. काय करायचे आहे, ते करून घ्या,” अशी धमकी देऊन निघून गेला.

यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली असता फिर्यादी ग्यानदेव चौरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी मयूर त्र्यंबक खालकर व राहुल पवार या दोघांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी करीत आहेत. हा फसवणुकीचा प्रकार दि. 10 सप्टेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत नाशिकरोड येथील बिटको पॉईंटजवळ घडला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group