नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- 70 लाख रुपयांची द्राक्षे ट्रान्स्पोर्टने पाठविल्यानंतर त्यापोटी केवळ नऊ लाख रुपये देऊन 61 लाख रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी योगेश रमण गोर्हे (वय 49, रा. श्रीराम कॉलनी, इंदिरानगर, नाशिक) हे इंपोर्ट व ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करतात. श्री स्वामी अॅग्रो नावाने त्यांची फर्म असून, त्यांची वडनेर भैरव येथे चार एकर शेती असून, त्यात द्राक्षांची बाग आहे.
दरम्यान, गोर्हे यांची आरोपी अमन कृष्णन ऊर्फ विशाल कापडणीस याच्याशी त्यांचे परिचित असलेले मुकुंद दिगंबर कुलकर्णी यांच्यामार्फत ओळख झाली. तो कृषीमालाची आयात-निर्यात बारा देशांमध्ये करीत असल्याचे सांगितले. अमन कापडणीस याच्या अमन अॅग्रो इंडस्ट्रीज, अमन इम्पेक्स इंडस्ट्रीज आणि मारुती अॅग्रो इंडस्ट्रीज या नावाच्या तीन कंपन्या आहेत. अमन याने फिर्यादी गोर्हे यांना आपल्या शेतातील द्राक्षे निर्यात करावयाची असल्यास त्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार आरोपी अमन कापडणीस याने गोर्हे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी आरोपी अमन व मुकुंद कुलकर्णी गोर्हे यांच्या घरी आले. त्यानंतर कापडणीस याच्या कंपनीमार्फत नाशिक येथील लॅबमध्ये द्राक्षे सॅम्पलकरिता पाठविली.
त्यानंतर काही दिवसांनी दि. 4 एप्रिल 2022 रोजी परचेस ऑर्डर नंबर 32 आणि 33 नुसार अमन इम्पेक्स इंडस्ट्रीज यांच्या नावे अनुक्रमे 26.30 टन याप्रमाणे एकूण 52.60 टन द्राक्षे निर्यातीची पहिली ऑर्डर दिली. त्यानंतर हा माल येथून पाठविल्यानंतर दहा दिवसांनी पैसे मिळतील, तसेच कमिशन एकूण विक्री किमतीच्या सहा टक्के असेल, असे आरोपी अमन कृष्णन याने सांगितले होते. ही ऑर्डर दुबईची असल्याचे सांगून याची किंमत 29 लाख 39 हजार 834 एवढी असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमन अॅग्रो एजन्सीच्या नावाने इनव्हाईस बनवीत असताना फिर्यादी यांना अमन कृष्णन आणि मुकुंद कुलकर्णी हे इनव्हाईस मारुती अॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावे बनविण्यास सांगितले.
त्याप्रमाणे फिर्यादी गोर्हे यांनी ते इनव्हाईस बनवून दोघांच्या ताब्यात पिंपळगाव येथे दिले. त्यानंतर द्राक्षमाल दुबईला पाठविल्याचे सांगितले. दहा ते बारा दिवसांनंतर फिर्यादी गोर्हे यांनी अमन कृष्णन याच्याशी फोनद्वारे संपर्क साधून पेमेंटबाबत विचारणा केली. त्यानंतर त्याने अनुक्रमे 1 लाख 49 हजार रुपये, 1 लाख रुपये, 2 लाख 70 हजार रुपये असे एकूण 4 लाख 19 हजार रुपये दिले. अशा प्रकारे आरोपीने 29 लाख 39 हजार 814 रुपयांपैकी एप्रिल 2022 अखेर 4 लाख 19 हजार रुपये एवढी रक्कम दिली.
त्यानुसार अमन कृष्णन आणि मुकुंद कुलकर्णी यांनी फिर्यादी गोर्हे यांना पुन्हा दुसरी मोठी ऑर्डर मिळाल्याचे सांगितले. हा माल कतार येथे पाठविला, तर अधिक नफा मिळेल, असे सांगितले; मात्र दुबईला पाठविलेल्या द्राक्षांच्या पैशाबाबत विचारणा केली असता आरोपींनी हे पैसे लवकरच मिळतील, असे सांगून वेळ मारून नेली.
त्यानंतर गोर्हे यांनी कतार येथे 52 टन द्राक्षे पाठविण्याची ऑर्डर स्वीकारली. त्यानुसार अमन इम्पेक्स इंडस्ट्रीजच्या नावे ऑर्डर तयार करून प्रोप्रायटर आरोपी मुकुंद कुलकर्णी याची सही केली. या मालाची एकूण किंमत 37 लाख 50 हजार रुपये इतकी होईल, असे सांगितले, तसेच 3 लाख 50 हजार रुपये आरोपींनी फिर्यादीकडून क्रेटसाठी घेतले होते. त्याची एकूण किंमत 41 लाख रुपये इतकी झाली.
त्याप्रमाणे फिर्यादी यांनी श्री स्वामी अॅग्रोच्या नावाचे इनव्हाईस तयार करून वरील मालाचे अमन कृष्णन आणि मुकुंद कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून ते अमन इम्पेक्स इंडस्ट्रीजच्या नावाने बनवून पिंपळगाव येथे त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर 20 दिवसांनी दुबई येथे पाठविलेल्या मालाचे 25 लाख रुपये व कतार येथे पाठविलेल्या मालाचे 41 लाख रुपये अशी एकूण 67 लाख रुपयांची मागणी केली असता त्याने पैसे लवकरच मिळतील, असे सांगून वेळ मारून नेली.
दरम्यान, पैशांबाबत विचारणा केली असता अमन कृष्णन याचे खरे नाव विशाल कापडणीस असल्याची माहिती मिळाली. त्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादी गोर्हे यांनी 70 लाख 20 हजार 628 रुपयांबाबत तगादा लावला असता त्याने आतापर्यंत 8 लाख 99 हजार रुपये दिले आहेत; मात्र त्याच्याकडून उर्वरित रक्कम 61 लाख 21 हजार 628 रुपये येणे बाकी असून, त्याची मागणी केली असता अमन कृष्णन याने अमन अॅग्रो इंडस्ट्री या नावाचा कॅनरा बँकेचा 71 लाख 47 हजार 672 रुपयांचा श्री स्वामी अॅग्रो नावाने चेक दिला होता. तो टी. जे. एस. बी. बँकेत टाकला असता ते खाते बंद असल्याने वटला नाही.
त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी वेळोवेळी गोर्हे यांना चेक दिले; मात्र ते डिपॉझिट केल्यानंतर आरोपींच्या खात्यावर पैसे नसल्यामुळे वटले नाहीत. अशा प्रकारे आरोपी अमन कृष्णन ऊर्फ विशाल कापडणीस व मुकुंद कुलकर्णी यांनी फिर्यादी गोर्हे यांचा विश्वास संपादन करून एकूण 61 लाख 21 हजार 628 रुपये परत न देता फसवणूक केली आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.