फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, आत्महत्येच्या एक दिवस आधी कुटुंबाला फोन करत म्हणाली, 'तो' नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाका,त्याचा फोन घेऊ नका
फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, आत्महत्येच्या एक दिवस आधी कुटुंबाला फोन करत म्हणाली, 'तो' नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाका,त्याचा फोन घेऊ नका
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगर : शिक्षण पूर्ण करून दीड महिन्यापूर्वीच शहरात नोकरीसाठी आलेल्या एका तरुणीच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. ब्लकमेलिंगला कंटाळून अवघ्या २२ वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

मूळची अहमदनगर जिल्ह्यातील वांजूळ येथील २२ वर्षीय निकिता रवींद्र पवार फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून दीड महिन्यापूर्वीच शहरात नोकरीसाठी आली होती.आविष्कार कॉलनीतील एका खोलीत राहून ती वोक्हार्ट नावाच्या कंपनीत नोकरी करत होती. तिच्यासोबतच्या इतर दोन मैत्रिणी सुट्ट्यांमुळे गावी गेल्या होत्या, त्यामुळे ती खोलीत एकटीच होती.

शनिवारी निकिता कामावर गेली नाही, म्हणून शेजारील खोलीतील मुली तिला मेसवर जाण्यासाठी बोलवण्यासाठी आल्या. मात्र, निकिताने दरवाजा उघडला नाही. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

निकीताच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी ब्लॅकमेलिंगचा संशय व्यक्त केला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकिताने तिच्या कुटुंबीयांना फोन करून सांगितले होते की, 'तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका.' तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरून २५ कॉल आले होते. 

निकिताच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सिडको पोलीस करत आहेत. पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाइलमधून  कोण तिला ब्लॅकमेल करत होते आणि तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group