पैशांसाठी सारखा तगादा लावणार्या सावकारांच्या जाचाला कंटाळून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मयत राजेंद्र भगवान परदेशी (वय 39, रा. ध्रुवनगर, शिवाजीनगर, नाशिक) यांनी श्यामराव पाटील ऊर्फ गिरनारकर (वय 53, रा. दुगाव, नाशिक) या खासगी सावकाराकडून वेळोवेळी दरमहा सहा टक्के व्याजाने 4 लाख 70 हजार रुपये घेतले होते.
परदेशी यांनी दुसरा सावकार नंदू बच्छाव याच्याकडूनदेखील तीन लाख रुपये दरमहा चार टक्के व्याजदराने घेतले होते. मागील चार वर्षांपासून या दोन्ही आरोपींसह त्यांचा मित्र मोहन खोडे हे राजेंद्र परदेशी यांना पैशांसाठी तगादा लावून त्रास देत होते. अखेर या त्रासाला कंटाळून राजेंद्र परदेशी यांनी आत्महत्या केली.
सावकारीच्या जाचातून त्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत करण्यात आला आहे. परदेशी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनिल फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी श्यामराव पाटील व मोहन खोडे यांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत.